बल्लारपुरात २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बल्लारपूर शहरातील शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी व मोबाईल सीडिंग पूर्ण करण्यासाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी याबाबत रास्तभाव दुकानदारांना निर्देश दिले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी सेवा सेतू कॅम्पच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी व मोबाईल सीडिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मिशन सुधार अंतर्गत प्राप्त यादीनुसार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे, मृत लाभार्थी वगळणे, दुबार लाभार्थ्यांची माहिती तपासणे तसेच उच्च उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत आढावा घेण्यात आला. ई-पॉस मशिनच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ई-केवायसी प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार बल्लारपूर शहरातील रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी संबंधित रास्तभाव दुकानात जाऊन पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी केले आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे रेशनवरील धान्य वितरण बंद होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष मोहिमेअंतर्गत बल्लारपूर शहरातील वैशाली चौक, साईबाबा वार्ड, जयभीम चौक तसेच वस्ती विभागात जव्हेरी मार्केट जवळ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी व मोबाईल सीडिंग पूर्ण करून घ्यावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.




Petrol Price




