अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू : गडचिरोलीतील आरोग्य यंत्रणेवर आजाद समाज पक्षाचा सवाल


- मुरुमगावातील ३१ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू; प्रसूती विभागाच्या तातडीच्या ऑडिटची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात माता व बाल मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करत आजाद समाज पक्षाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत तिसरा माता-बाल मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील ३१ वर्षीय दिव्या रामसिंग उसेंडी यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाल्याचे पक्षाने शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजाद समाज पक्षाच्या निवेदनानुसार, यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कोजबी येथील नाजुका दिवाकर राऊत यांचा, तर २३ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील जिजा हंसराज सातर यांचा गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या सलग घटनांमुळे जिल्ह्यातील माता व बालकांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.
कोट्यवधींचा खर्च, तरी रुग्णांची सुरक्षितता कुठे? -
गडचिरोली हा आदिवासीबहुल तसेच विशेष मागास जिल्हा असल्याने येथील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी, यासाठी विविध योजना व सुविधा राबविल्या जात असतानाही माता-बाल मृत्यूच्या घटना घडत असल्याबद्दल आजाद समाज पक्षाने चिंता व्यक्त केली आहे.
गरीब, आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांना जर सुरक्षित व दर्जेदार उपचार मिळत नसतील, तर आरोग्य सुविधांसाठी खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा उपयोग नेमका कोणासाठी केला जात आहे, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. प्रसूतीसारख्या संवेदनशील आणि अत्यावश्यक उपचारांमध्येही रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक माता-बाल मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी -
माता व बाल मृत्यूच्या प्रत्येक घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाने केली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये उपचाराची प्रक्रिया, वेळेत मिळालेली वैद्यकीय मदत, उपलब्ध सुविधा, आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती तसेच रुग्णालयातील व्यवस्थापन यांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, चौकशीत निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
प्रसूती विभागाचे तातडीने ऑडिट करा -
जिल्ह्यातील प्रसूती विभागाच्या संपूर्ण व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रसूती विभागातील मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन सेवा आणि गंभीर रुग्णांना वेळेत मिळणारी उपचार व्यवस्था यांचे परीक्षण करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
माता-बाल मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा या प्रश्नावर आजाद समाज पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी निवेदनातून दिला आहे.
माता व बालकांचे जीव वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने केवळ निधी आणि सुविधा उपलब्ध असल्याचे दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष उपचार व्यवस्थेची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी पक्षाने केली आहे.




Petrol Price




