भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब, आज वा उद्या अधिकृत घोषणा होणार ?


वृत्तसंस्था / मुंबई : दिल्लीत झालेल्या  भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा  उद्या मंगळवारी युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून बसलेल्या भाजपने ऐनवेळी 'मित्रपक्षा'च्या जागांमध्ये पाच-सहा जागांची वाढ करीत युतीचा निर्णय घेतल्याचे कळते.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास भाजपला किमान १६० जागा मिळतील असा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. तरीही शिवसेनेसोबतची युती तोडता कामा नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने भूमिका घेतल्याची माहिती आहे.    युतीच करायची असेल तर शिवसेनेला १२० जागाच दिल्या जाव्यात अशी भूमिका दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे युतीच्या जागावाटपातील गुंता अधिकच वाढला होता. मात्र, दिल्लीतील नेत्यांचा विरोध एका बाजूला ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची युती कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता. रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा १२० वरून १२५ ते १२६ वर जाणार असल्याचीही माहिती आहे. 
भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा गांभीर्याने विचार करीत असून दोन चार जागा सोडल्या तर मित्रपक्षांच्या इतर उमेदवारांना भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचे कळते. विशेष म्हणजे मित्रपक्षाला द्यावयाच्या काही जागा शिवसेनेकडेही फिरविण्यात येणार असल्याचे कळते. यामुळे शिवसेनेच्या जागांचा आकडा वाढणार असून तेही मित्रपक्षांच्या उमेदवाराला धनुष्यबाणावर लढविण्याची शक्यता आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-30


Related Photos