ब्लॅकमेलिंगच्या पैशांसाठी मित्राची निर्घृण हत्या? : समलैंगिक संबंध दाव्याला कुटुंबीयांचा स्पष्ट इन्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सोशल मीडियावरील मैत्रीतून झालेल्या सतीश निषाद हत्याकांडाला काही प्रसारमाध्यमांनी दिलेले समलैंगिक विवाहाच्या नकारातून हत्या हे कारण पूर्णपणे चुकीचे असून, प्रत्यक्षात हे प्रकरण ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक खंडणीशी संबंधित असल्याचा खळबळजनक दावा मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. नागेपल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मृतकाचा भाऊ सारोज निषाद, मोठे भाऊ पवन आणि चुलत भाऊ ब्रजकुमार निषाद यांनी या प्रकरणासंदर्भात अनेक गंभीर आरोप करत तपासाची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून सतीश निषाद याच्याशी संपर्क साधला होता. आरोपी मुलीचा हुबेहूब आवाज काढून फोनवर संवाद साधत असल्याने मृतकाला त्याच्या फसवणुकीची कल्पना आली नव्हती. या बनावट ओळखीच्या माध्यमातून आरोपीने मृतकाशी जवळीक निर्माण केली आणि नंतर विविध कारणांनी बदनामीची भीती दाखवत त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला.
सततच्या मानसिक त्रासाला आणि आर्थिक लुटीला कंटाळून मृतकाने आरोपीचे फोन क्रमांक ब्लॉक केले होते. त्यानंतर आरोपीने मृतकाच्या मित्रमंडळींना व नातेवाईकांना संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर तो थेट आलापल्ली-नागेपल्ली परिसरात येऊन सतीशचा शोध घेत असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी आणि मृतक यांची भेट झाली होती. यावेळी सतीशने आरोपीला यापुढे ब्लॅकमेल करू नये, अशी स्पष्ट ताकीद दिली होती. आरोपीने त्यावेळी माफी मागून समझोता केल्याचे भासविले. मात्र दुसऱ्याच दिवशी आपल्या मूळ गावी जात असल्याचे सांगून आरोपीने सतीशला वाहनात बसविले आणि जंगलातील निर्जन स्थळी नेले. तेथे चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
पत्रकार परिषदेत मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपीसोबतचे मोबाईल चॅट, बँक व्यवहारांचे तपशील, पैसे हस्तांतरित केल्याचे व्यवहार आयडी तसेच इतर तांत्रिक पुरावे माध्यमांसमोर सादर केले. या सर्व बाबींची पोलीसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, कोणतीही खातरजमा न करता काही माध्यमांनी या प्रकरणाला समलैंगिक संबंधांचे स्वरूप दिल्याने कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून यामागे मोठे ब्लॅकमेलिंग रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.
या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली.
News - Gadchiroli




Petrol Price




