आदिवासी विकास दौडमध्ये खड्ड्यांमधून धावले विद्यार्थी


- शहरातील विद्यार्थ्यांचा दौडला उदंड प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने आज ९ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास दौड चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे’ हे समजायला मार्ग नसलेल्या चामोर्शी मार्गावरून घेण्यात आली. यामुळे खड्डे आणि चिखलामधून विद्यार्थी या स्पर्धेमध्ये धावले. 
पोलिस विभागाच्या वतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. शहरातील शाळांमधील तसेच वस्तीगृहांमध्ये राहत असलेले शेकडो विद्यार्थी तसेच सिआरपीएफचे व जिल्हा पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्ग खड्ड्यांनी व्यापलेले आहेत. चंद्रपूर आणि धानोरा मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे चामोर्शी मार्गाने स्पर्धा आयोजित केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र हा मार्ग खड्ड्यांनी जर्जर झालेला आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेचेही दूर्लक्ष झाले आहे. वाहनधारक तसेच पायी जाणाऱ्या नागरीकांनाही रस्ता शोधावा लागतो. मग विद्यार्थी धावणार तरी कसे? स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पायात बुटही नव्हते. तरीही विद्यार्थी जागा मिळेल तिथून धावत होते. रस्ता उखडलेला आहे. बारीक गिट्टी पसरलेली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी भरलेले आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. पोलिस विभागाच्या वतीने पाणी, देखरेखीसाठी बुलेटस्वार पोलिस जवान, रूग्णवाहिका तसेच इतर सोय करण्यात आली होती. विद्यार्थी इंदिरा गांधी चौक - सेमाना - जिल्हा न्यायालय - टी पाॅईंट चौक ते पोलिस मुख्यालय या मार्गे दौड स्पर्धेमध्ये धावले.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-09


Related Photos