शासन निर्णय येईपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही : आशासेविका निर्णयावर ठाम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आशासेविका व गटप्रवर्तकांच्या मागणीसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शासन निर्णय जारी केल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत हजारो आशासेविका बुधवारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत.
राज्यातील ३० हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन निर्णय जाहीर करा, अशी मागणी करीत शहापूर ते मुंबई लाँग मार्च काढला आहे. दरम्यान, ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन दोन दिवस महामुक्काम आंदोलन केले.
त्यानंतर हजारो आशासेविका आझाद मैदानात दिवस- रात्र आंदोलन करीत आहेत. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत आशासेविकांच्या आंदोलनावर चर्चा झाली. प्रधान सचिवांना याबाबत जबाबदारी देण्यात आली. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आशा गट प्रवर्तक ठाम :
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. मात्र, शासन निर्णय होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, यावर आशा गट प्रवर्तक ठाम आहेत, अशी भूमिका आशा गट प्रवर्तक कृती समितीचे राजू देसले, कॉ. आर. मायती इराणी, कॉ. एम.ए. पाटील, दत्ता देशमुख, उज्ज्वला पडलवर, शंकर पुजारी, आनंदी अवघडे, हनुमंत कोळी, मुगाजी बुरूड, सचिन आंदले, शबाना शेख, आदींनी घेतली आहे.
News - Rajy