महत्वाच्या बातम्या

 मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून कोरोना काळातील मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानीची संवेदनशीलपणे दखल


- मासेमारीसाठी तलाव ठेका माफीचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे. सन २०२१-२२ या वर्षात कोरोना काळात मत्स्य व्यावसायिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता तलाव ठेका माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी दिलासा मिळेल असा विश्वास राज्याचे वन, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. कोरोना साथीच्या काळात संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रातही गंभीर स्थिती होती. सर्वसामान्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला, विशेषतः छोटे व्यावसायिक, लहान उद्योजक आर्थिक संकटात सापडले.

या सर्वांना विविध माध्यमातून मदत प्रशासनाकडून झाली. परंतु मासेमारी करणारा व्यावसायिक मात्र यातून सावरला नव्हता, त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. तशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मासेमारी करणाऱ्या बांधवांकडून करण्यात आली. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विषयाची गांभीर्याने दखल घेतली. तलाव ठेका माफ करण्याबाबत योग्य कार्यवाही करुन मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. विधान भवन येथे गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.

या निर्णयामुळे राज्यातील सहा हजारांपेक्षा अधिक मच्छीमार सभासदांना लाभ होणार असून लाभार्थ्यांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था तसेच सहकारी संस्था तसेच खासगी ठेकेदार यांचा समावेश आहे. ज्या मच्छीमार सहकारी संस्था व खासगी ठेकेदारांनी सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या वर्षांची तलाव ठेका रक्कम भरलेली आहे व ज्या तलावांचा ठेका कालावधी २०२३-२४ या वर्षी सुद्धा आहे,  त्यांना या माफीचा लाभ मिळणार आहे. माफ झालेली ही तलाव ठेका रक्कम परत न करता सन २०२१-२२ ची ठेका रक्कम सन २०२३-२४ करीता समायोजित करण्यात येणार आहे.  





  Print






News - Rajy




Related Photos