महत्वाच्या बातम्या

 कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना


- शेतकऱ्यांनी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव नियंत्रित ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवून शेतकऱ्यांनी उपाययोजना करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

जिनिंग व प्रेसिंग मिल, गोडाऊन, मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दिर्घ काळासाठी साठवणुक केली जात असल्याने अशा कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्थानंतर घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्त्रोतस्थान म्हणुन काम करतात. गुलाबी बोंडअळीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी शेतकऱ्यांनी कापूस फरदड मोहिम राबवावी.

जानेवारी २०२३ अखेर पर्यंत सर्व गावातील कापूस पीक शेतातून  पूर्णपणे काढून टाकावे व फरदड घेऊ नये. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित करण्यासाठी ५ ते ६ महिने कापूस विरहित शेत ठेवावे. गुलाबी  बोंडअळीस डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास सुप्तावस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे किडीचे जीवनचक्र अखंडीतपणे सुरु राहून पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव  पुन्हा वाढतो. फरदडीपासून थोडेफार उत्पादन सुरु राहून पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो. 

फरदडीपासुन थोडेफार उत्पादन मिळत असले तरी या किडीला पुढील हंगामात प्रादुर्भाव टाळण्यासाठी  शेतकऱ्यांनी फरदड न  घेता पहृयाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राव्दारे पहृयाट्यांचे छोटे छोटे तुकडे करुन ते जमिनीत गाडावेत.

कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात शेळ्या, मेंढया व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे खाल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कपाशीच्या पहृयाटयांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करुन बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पहृयाट्या, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. पहृयाट्या शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा, इंधन ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्यांत द्याव्यात.

पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडींचे कोष तसेच  इतर अवस्था नष्ट होतील. मार्केटयार्ड, जिनिंग-प्रेसिंग मिल परिसरात कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील अळ्या व कोष नष्ट करावे. तसेच त्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पंतग नियमित गोळा करुन नष्ट करावेत, असे कृषी विभागाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos