वर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर


- शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २०० गुन्हे उघडकीस 
- शहरातील २२ चौकांत ८० कामेराद्वारे नजर
- पोलिस अधीक्षक कार्यालयात २४ तास महिला कर्मचाऱ्यांकडून देखरेख
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी  / वर्धा : 
शहरातील गुन्हेगारी...वाढत्या घरफोड्या...विस्कळीत वाहतूक...या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याकरीता पोलिस विभागाकडून शहरात तब्बल २२ चौकांमध्ये  ८० सीसीटीव्ही कामेरे लावले आहेत. एकदरीत तुम्ही काय करता, काय नाही, याचे थेट चित्र पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात दिसते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या हालचालींवर तिसया डोळ्याचा वॉच आहे. मात्र, यामुळे अनेक गुन्हे वर्षभरात उघडकीस आले आहे. एक वर्षात तिसऱ्या डोळ्याने सुमारे २०० च्यावर गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली आहे. 
शहरात मागील काही दिवसांपासून घरफोड्या, खून, जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण आदींसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. याकरीता पोलिस विभागाने परिवर्तन वर्धा वार्षिक योजना या नाविण्यपूर्ण प्रकल्पातून ‘सुरक्षीत शहर प्रकल्प’ या योजनेंतर्गत शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरीता शहरातील २२ मुख्य चौकांमध्ये  ८० सीसीटीव्ही कामेरे लावलेले आहेत. या कामेरा द्वारे थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात शहरातील एकूण एक छोट्या-मोठया हालचालींवर लक्ष ठेवल्या जात आहे. सुमारे १ कोटी ८० लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या ;कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात का होईना आळा बसला आहे. तसेच वाहतूकीच्या समस्येवरही नियंत्रण मिळण्यात पोलिस विभागाला यश प्राप्त होत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अल्का राठोड़, वर्षा राठोड़, रुकसाना शेख,प्रेमा रिचारिया, स्मिता महाजन, प्रिया पिसे अशा  सात महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून २४ तास नियंत्रण ठेवल्या जात आहे. तिसऱ्या डोळ्याने पोलिस विभागाला खूनांसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली आहे. सामान्य रुग्णालय परिसरात झालेला खून, आर्वीनाका परिसरात झालेली मारहाण आणि खून,  वंजारी चौकात झालेला खून आणि दुचाकी चोरटे तसेच इतर गुन्हे सीसीटीव्ही  कामेराच्या माध्यमातून उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालतील नियंत्रण कक्षावर जनसंपर्क अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सारंग बोम्पलीवार यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. शहरासह जिल्ह्यातील इतरही शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पोलिस विभागाचा प्रयत्न आहे.

 
‘पीए’ सिस्टम' ठरत आहे फायद्याची

शहरातील रेल्वेस्थानक परिसर, बजाज चौक, सोशालिस्ट चौक, सराफा लाईन आणि आर्वी नाका या पाच मुख्य चौकांमध्ये  पीए (पब्लीक अ‍ॅड्रेस सिस्टम) द्वारे नागरिकांना वारंवार सतर्क करण्यात येत आहे. लाऊडस्पिकरद्वारे बाजारातील गर्दी, विस्कळीत वाहतूक तसेच इतर छोट्या मोठया गोष्टींवर नियंत्रण
ठेवल्या जात आहे. विशेष म्हणजे अचानक पोलिसांचा आवाज येत असल्याने नागरिकही पोलिसांच्या सूचनांचे पालन करताना दिसते. ही पीए सिस्टम इतरही चौकांमध्ये लावण्याची गरज असून पोलिस विभागाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
 
हिंगणघाट शहरातही राहणार तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’ 

वर्धा शहरात कोटी रुपये खर्चून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे  अनेक  गंभीर गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातही आता सीसीटीव्ही लावण्याचे प्रयत्न सुरु आहे. हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही कामेरे लागल्यास हिंगणघाट शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास पोलिसांना यश येणार हे मात्र तितकेच खरे!
 
चंद्रपूरच्या नेत्यांनीही घेतली दखल

मोठया मोठया शहरांमध्ये सीसीटीव्हीद्वारे शहरावर नियंत्रण ठेवल्या जाते. त्या अनुषंगाने वर्धा शहराची लोकसंख्या पाहता शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांमुळे पोलिस विभागाला आलेल्या यशामुळे आता वर्धा शहरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची दखल चंद्रपूर येथील नेत्यांनी घेतली आहे. चंद्रपूर शहरातही आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याने तेथील गुन्हेगारीवरही वचक निर्माण होणार आहे.

 
काय म्हणाले अप्पर पोलीस अधीक्षक 

शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे भरपूर गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सीसीटीव्हीमुळे भरपूर फायदा मिळत असून नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे. सध्या पाचच चौकांमध्ये पीए (पब्लीक अ‍ॅड्रेस सिस्टम) चे काम पूर्ण झाले असून शहरातील इतरही चौकात ही सिस्टम लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर येथील नेत्यांनी वर्धा शहरात लागलेल्या कॅमेऱ्याची दखल घेतली असून चंद्रपूरातही कॅमेरे लावण्यात येणार आहे. याबरोबरच शहरात होणारे मोर्चे, आंदोलने यावरही नियंत्रण मिळण्यास मदत होत आहे. घरफोड्या, खून, मारहाणीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यास सीसीटीव्ही कॅमेराचा महत्वाचा वाटा आहे. हिंगणघाटातही सीसीटीव्ही कामेरा लावण्याचा आमचा मानस आहे. एकंदरीत सीसीटीव्हीमुळे पोलिस विभागाला गुन्हे उघड करण्यास मदत होत आहे. - निखील पिंगळे , अपर पोलिस अधीक्षक, वर्धा जिल्हा  Print


News - Wardha | Posted : 2018-12-01


Related Photos