महत्वाच्या बातम्या

 ईव्हीएम- व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण


- निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघांतर्गत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन (सरमिसळ) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर रँडमायझेशन करतेवेळी 13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी विनय गौडा यांनी उपस्थित राजकीय पक्षांना, द्वितीय रँडमायझेशन नुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट जाईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर रँडमायझेशन राजकीय पक्षांच्या समक्ष करण्यात आले आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 118 असून यासाठी 2 हजार 610 बॅलेट युनिट, 2 हजार 610 कंट्रोल युनीट आणि 2 हजार 818 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय रँडमायझेशन नुसार राजूरा विधानसभा मतदारसंघातील 330 मतदान केंद्रासाठी (बीयू – 412, सीयू – 412 आणि व्हीव्हीपॅट - 445), चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 383 मतदान केंद्रासाठी (बीयू – 478, सीयू – 478 आणि व्हीव्हीपॅट - 517), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील 361 मतदान केंद्रासाठी (बीयू – 451, सीयू – 451 आणि व्हीव्हीपॅट - 487),  वरोरा विधानसभा मतदारसंघातील 340 मतदान केंद्रासाठी (बीयू – 425, सीयू – 425 आणि व्हीव्हीपॅट - 455), वणी विधानसभा मतदारसंघातील 338 मतदान केंद्रासाठी (बीयू – 405, सीयू – 405 आणि व्हीव्हीपॅट - 439) आणि आर्णि विधानसभा मतदारसंघातील 366 मतदान केंद्रासाठी (बीयू – 439, सीयू – 439 आणि व्हीव्हीपॅट - 475) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.

यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, संगणकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सतिश खडसे उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos