शिक्षकांच्या तणाव व्यवस्थापनावर वरोऱ्यात मार्गदर्शन


- इनरव्हील क्लब ऑफ वरोराचा शिक्षक दिनानिमित्त उपक्रम; मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात रंगत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वरोरा यांच्या वतीने अरविंद निकेतन स्कूल येथे शिक्षकांसाठी तणाव व्यवस्थापन विषयावर विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला. शिक्षकांच्या व्यस्त आणि जबाबदारीच्या कार्यशैलीत मानसिक व शारीरिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात फिटनेस ट्रेनर व न्यूट्रिशनिस्ट झैनब सॅडिकोट यांनी तणाव आणि त्याचा काम व जीवनावर होणारा परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणावाचा थेट परिणाम शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य, कार्यक्षमता आणि कौटुंबिक जीवनावरही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तणाव कमी करण्यासाठी केवळ मानसिक सकारात्मकता पुरेशी नसून, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप व विश्रांती आणि काम-जीवनातील योग्य संतुलन या बाबींची सांगड घालणे आवश्यक असल्याचे झैनब सॅडिकोट यांनी सांगितले. शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन विद्यार्थ्यांसाठी अधिक सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात रंगत -
सेमिनारनंतर क्लबच्या ISO शेंद्रे यांच्या पुढाकाराने शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभले. दैनंदिन अध्यापनाच्या धकाधकीतून काही काळ विरंगुळा मिळाल्याने शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये उत्साहासोबतच परस्पर संवाद आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला अरविंद निकेतन स्कूलचे प्राचार्य जुमडे सर तसेच बोर्ड सदस्य नांदूरकर सर यांची विशेष उपस्थिती होती.
क्लब सदस्यांची उपस्थिती -
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा स्नेहल पत्तीवार, सचिव प्राजक्ता कोहळे, उपाध्यक्षा प्रतिभा मणियार यांच्यासह झैनब सॅडिकोट, कविता बाहेती, माधवी शेंद्रे, प्रणाली बेदरकर, वैशाली पदमावर आणि इनरव्हील क्लबच्या अन्य सदस्यांनी सहकार्य केले.
शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना तणावमुक्त वातावरणात कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. निरोगी शिक्षकच निरोगी शैक्षणिक वातावरण घडवतो हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
शिक्षकांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य आणि कार्यक्षमता यांचा थेट संबंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.




Petrol Price




