महत्वाच्या बातम्या

 कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) टंचाई निवारणाची कामे


- दुष्काळ निवारण कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, खनिजमधूनही निधी उपलब्ध करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : एलनिनोचा प्रभाव आणि कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई स्थिती हाताळण्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीची मदत घेतली जाणार आहे. या निधीतून नाला खोलिकरण आणि तलावांमधील गाळ काढण्याचे प्रस्तावित असून यासाठी कंपन्यांकडून निधी मिळविण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, खनिज, जलसंधारण, जलसंपदा, अग्रणी बॅंक आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरवर्षी पाणी टंचाई निवारणाचा आराखडा तयार करून जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी आतापासूनच काही ठिकाणी टंचाई स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईची कामे आतापासूनच सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नवीन जुन्या पाणी स्त्रोतांचे मजबुतीकरण -
एलनिनोचा प्रभाव पुढेही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचे नवीन स्त्रोत व अस्तित्वातील स्त्रोतांचे मजबुतीकरण महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती कामे प्रस्तावित करावी. यावर्षी प्रथम टप्प्यात ४४ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्राधान्यक्रम ठरवून इतर बंधारे देखील दुरुस्ती, गाळ काढण्यासाठी प्रस्तावित करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

खनिज निधीतून टंचाई प्रस्तावांना मंजुरी -
जिल्हा खनिज निधीतून यावर्षी आपण पाणी टंचाई निवारणाची कामे घेणार आहोत. त्यासाठी जलसंधारण विभाग व लघु सिंचन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावे. यातून प्राधान्याने नाला खोलीकरण, साठवण बंधारे, मामा व इतर तलावांच्या कामांना तत्काळ प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरु करण्याचे निर्देश दिले.

जलजीवनच्या ६६ योजना सुरु होणार -
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या ६६ पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण झाली आहे. या योजनांना वीज कनेक्शन उपलब्ध झाल्यास योजना लगेच सुरु होऊ शकतात. त्यामुळे तातडीने कनेक्शन देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्या. यासाठी लागणारा निधी व प्रशासकीय मान्यता तातडीने घेण्याची सूचना केली.

टंचाई निवारण कामांसाठी यंत्रांचे दर -
जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध कामे केली जाणार आहे. त्यासाठी जेसीबी, पोकलॅंड, टॅंकर, ट्रॅक्टर आदी यंत्र, वाहनांची गरज भासणार आहे. भविष्यातील किचकट आणि वेळखाऊ बाबी टाळण्यासाठी या सर्व यंत्रांचे दर निश्चित करण्यात येणार आहे. तशा सुचना बैठकीत संबंधित विभागांना देण्यात आल्या.

सीएसआर निधीसाठी कंपन्यांसोबत बैठक -
कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत टंचाई निवारणासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही कंपन्यांसोबत आज बैठक घेतली. विविध शासकीय कार्यालयांची खाती असलेल्या राष्ट्रीयकृत बॅंका तसेच मोठ्या सहकारी बॅंका, सोसायट्यांची देखील टंचाई निवारणासाठी मदत घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे.





  Print






Related Photos