भरधाव दुचाकीची कारला धडक : तरुणाचा मृत्यू


- वाघनदी पुलाजवळील वळणावर भीषण अपघात; मागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविताना समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लांजी रोडवरील वाघनदी पुलाजवळ २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात सुकराम किसन मेश्राम वय ३०, रा. आवारीटोला, ता. लांजी, जि. बालाघाट याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.
वळणावर कारला जोरदार धडक -
मिळालेल्या माहितीनुसार, सुकराम मेश्राम हा त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवीत होता. रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीचे भान न ठेवता तो आमगावकडून कारंजाच्या दिशेने जात होता. दरम्यान, वाघनदी पुलाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या कारला त्याने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की सुकरामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही या अपघातात गंभीर दुखापत झाली.
निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा -
या घटनेप्रकरणी हवालदार खुशालचंद बर्वे (वय ४८) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी सोमवारी, १४ रोजी रात्री ८.५७ वाजता गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १२८(१) आणि १७७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कथले करीत आहेत. अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहनांचा वेग आणि घटनेमागील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




Petrol Price




