विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ : छात्रों की गूंज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच रोजगारविषयक प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे, यासाठी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या छात्रों की गूंज – महिला विशेष कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील एआयएसएसएमएस मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडचणी, आर्थिक प्रश्न, रोजगाराच्या संधी, सुरक्षा, समानता आणि भविष्यासंबंधी विविध मुद्द्यांवर संवाद साधला जाणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा पद्धती, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, रोजगाराच्या मर्यादित संधी तसेच शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणे आवश्यक असून, छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज थेट राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे धोटे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती तसेच विद्यार्थी संघटनांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. पुण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी होऊन या संवादाचा भाग बनावे, असेही आवाहन धोटे यांनी केले. विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद झाला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व युवकाने छात्रों की गूंजशी जोडले गेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.




Petrol Price




