सेवा संकल्प अभियानांतर्गत चिचाळ ग्रामपंचायतीत मोफत सेवायोजन नोंदणी उपक्रम यशस्वी


- ३६ उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर नोंदणी; ९१ युवकांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत पवनी तालुक्यातील चिचाळ ग्रामपंचायत येथे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विशेष सेवायोजन नोंदणी व मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या निर्देशानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना महास्वयंम पोर्टलवर निःशुल्क सेवायोजन नोंदणी (Employment Card) करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच उपस्थित उमेदवारांशी थेट संवाद साधून त्यांना शासनमान्य रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमासाठी लिपिक-टंकलेखक अमित मलोडे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक अतुल पडोळे यांनी चिचाळ ग्रामपंचायतीला भेट देऊन नोंदणीची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण केली. या वेळी चिचाळ ग्रामपंचायतीचे सरपंच मधुसूदन काटेखाये आणि लिपिक चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती व मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरात एकूण ९१ सुशिक्षित नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ३६ पात्र उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर सेवायोजन नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. शासनाच्या या पुढाकारामुळे पुनर्वसित गावठाणातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित सर्व पात्र युवक-युवतींनीही महास्वयंम पोर्टलवर आपली सेवायोजन नोंदणी करून शासनाच्या रोजगारविषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.




Petrol Price




