महत्वाच्या बातम्या

 बाजारातील मागणी नुसार पीक विविधीकरणाचे मॉडेल विकसित करा : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल


धानासोबत मका, नाचणी, काजू, फळबागा, भाजीपाला व मसाला पिकांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : हमीभावाच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी सुरू असली तरी केवळ पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता बाजारातील मागणी, स्थानिक कृषी परिस्थिती आणि विक्रीच्या उपलब्ध संधींचा विचार करून पर्यायी पिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील विक्रीच्या संधी लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची क्षमता असलेल्या पिकांकडे वळण्यासाठी जिल्ह्यात पीक विविधीकरणाचे व्यवहार्य मॉडेल विकसित करावे, अशा सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात कृषी महाविद्यालय आणि जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची सद्यस्थिती, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, कृषी शिक्षण व संशोधन, पीक पद्धतीतील बदल तसेच बाजारपेठेशी शेतमालाची जोडणी या विविध विषयांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

धानासोबत पर्यायी पिकांच्या संधींचा अभ्यास -
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असल्याने त्यासोबत अन्य आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पिकांच्या लागवडीला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले. मका, नाचणी, काजू, फळबागा, भाजीपाला आणि मसाला पिके यांची जिल्ह्यातील विविध भागांमध्ये उत्पादन क्षमता तपासावी, असे त्यांनी निर्देश दिले.

या पिकांची निवड करताना केवळ उत्पादन क्षमतेचा विचार न करता माती व हवामान, पाण्याची उपलब्धता, उत्पादन खर्च, बाजारातील मागणी, विक्रीची हमी आणि अपेक्षित उत्पन्न या सर्व बाबींचा अभ्यास करावा. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या पीक पद्धती विकसित करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

लायबिलिटी टू ॲसेट क्रॉप कन्व्हर्जन मॉडेल विकसित करण्यावर भर -
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पिकांकडे विविधीकरण करण्याच्या दृष्टीने लायबिलिटी टू ॲसेट क्रॉप कन्व्हर्जन मॉडेल विकसित करण्याची सूचना ॲड. जयस्वाल यांनी केली.

या माध्यमातून कमी परतावा देणाऱ्या पारंपरिक पीक पद्धतीसोबत अधिक मूल्य आणि बाजारपेठेतील मागणी असलेल्या पिकांचा समावेश करता येईल. त्यासाठी प्रत्येक भागातील कृषी परिस्थितीचा अभ्यास करून स्थानिक पातळीवर योग्य पीक पद्धती निश्चित करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

निर्यातक्षम शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन -
निर्यातक्षम शेतीमालाचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमालाची बाजारपेठेशी जोडणी अधिक मजबूत करावी, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाचे एकत्रीकरण, दर्जानुसार वर्गीकरण, मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि बाजारपेठेशी थेट संपर्क यावर भर द्यावा. उत्पादक ते ग्राहक या साखळीतील अनावश्यक अडथळे कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या विक्रीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.

कृषी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा आढावा -
बैठकीच्या प्रारंभी कृषी महाविद्यालयाच्या सह-अधिष्ठाता डॉ. माया राऊत यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रक्षेत्र उपक्रम, प्रयोगशाळा, संशोधनविषयक कामकाज आणि उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

महाविद्यालयातील रिक्त पदे तसेच पायाभूत सुविधांच्या आवश्यकतेबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नांची दखल घेत ॲड. आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा -
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा बैठकीत सादर केला.यामध्ये सेंद्रिय शेती, SMART प्रकल्प, रब्बी हंगामाचे नियोजन आणि कृषी यांत्रिकीकरण योजना यांची माहिती देण्यात आली. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबतही चर्चा झाली.

कृषी महाविद्यालय व विभागाच्या समन्वयावर भर -
गडचिरोलीतील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी महाविद्यालयातील संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा यांचा समन्वय वाढविण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. बाजारपेठेतील बदलांचा अभ्यास करून त्यानुसार शेतकऱ्यांना पीक निवड, उत्पादन तंत्रज्ञान आणि विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विषय विशेषज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेती अधिक बाजाराभिमुख आणि विविधतापूर्ण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी उपलब्ध संधींचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.





  Print






Related Photos