भंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
बी.पी.ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आलेल्या आरोपीस सोडून देण्याकरिता ५ हजार रुपये लाच रकमेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. दिलीप गायधने असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे . 
तक्रारदाराच्या मुलाच्या मित्रावर ३ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत ११०,११२ व ११७ बी.पी.ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली होती. सदर कार्यवाही केल्यानंतर यातील आरोपीस सोडून देण्याकरिता तक्रारदार यांनी विनंती केली असता पो.स्टे. भंडारा येथे कार्यरत पोलीस हवालदार दिलीप गायधने यांनी तक्रारदारास व त्यांचे मित्रास त्रास न देण्याकरिता ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास पोहवा दिलीप गायधने यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. 
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून ४ सप्टेंबर रोजी सापळा पडताळणी दरम्यान पोहवा दिलीप गायधने यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलाचे मित्रास कलम ११०,११२ व ११७ बी.पी.ऍक्ट अन्वये केलेल्या कार्यवाही मधून सोडून देण्याकरिता व पुढे त्रास न देण्याकरिता ५ हजार रुपयाची लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याविरुद्ध १७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन  भंडारा येथे कलम ७ (ब) ला.प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले, सफौ. गणेश पडवार, पोहवा संजय कुरंजेकर, पो.ना. गौतम राऊत, सचिन हलमारे, रवींद्र गभणे अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, चानापो शी दिनेश धार्मिक सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांनी  केली आहे. 
अँटी करप्शन ब्युरो तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कायालयामध्ये कोणी अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाशी संपर्क साधावा.  

   Print


News - Bhandara | Posted : 2018-10-17


Related Photos