महत्वाच्या बातम्या

 मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले.

मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, वरिष्ठ अधिकारी व मेंढपाळ समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनमंत्री मुनगंटीवार यांनी मेंढपाळाच्या समस्या जाणून घेत त्या सकारात्मक दृष्टीने सोडविण्याची तयारी दर्शविली. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करण्याबाबत इतर राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना, मेंढपाळांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेवून त्यावरील उपाययोजना कराव्यात. तसेच मेंढीपालन व चराई कुरण राखीव करण्यासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतूदी, नियमांचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे, अशा सूचना मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मेंढपाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात सचिव स्तरावर प्राथमिक बैठक घ्यावी. पुढील 20 दिवसानंतर पशुसंवर्धन, गृह आणि वन विभागाची पुन्हा संयुक्त बैठक घेवून शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

शासकीय जमिनीवर मेंढी चराई करणाऱ्या मेंढपाळांना वन कर्मचाऱ्यांकडून मारहाण होत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. त्यावर वन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट करून मेंढपाळांनी अशा घटनांविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos