भरधाव कारची दुचाकीला समोरासमोर धडक : तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर


- आमगाव-देवरी मार्गावरील लोहारा बसस्थानकाजवळ भीषण अपघात; जखमींवर गोंदियात उपचार सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव-देवरी मार्गावरील लोहारा बसस्थानकाजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी ३ रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. दुर्योधन उर्फ सोनू देवानंद भक्तवर्ती (२९, रा. ननसरी, आमगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या अपघातात ललित प्रेमकुमार पंधराम (२२), नरेश प्रल्हाद वासनिक (३०), दोघेही रा. ननसरी, आमगाव आणि कार्तिका राजेश बागडे (१७, रा. परसटोला, देवरी) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवरीकडून आमगावकडे जात होते चौघे -
प्राप्त माहितीनुसार, आमगाव तालुक्यातील ननसरी येथील रहिवासी ललित पंधराम, नरेश वासनिक, देवानंद भक्तवर्ती आणि कार्तिका बागडे हे चौघे एमएच ३५ एडी ५४८३ क्रमांकाच्या मोटारसायकलने देवरीकडून आमगावच्या दिशेने जात होते.
दरम्यान, आमगावकडून देवरीकडे एमएच ३५ एडब्ल्यू ७२१५ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. लोहारा बसस्थानकाजवळ दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा समोरील टायरही फाटला. या अपघातात दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
देवरीत प्राथमिक उपचारानंतर गोंदियाला हलविले -
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी ४ देवानंद भक्तवर्ती यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिन्ही जखमींवर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या हात, पाय, डोके आणि छातीला गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे.
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल -
या अपघातप्रकरणी मृत तरुणाचे नातेवाईक प्रेमकुमार पंधराम यांच्या तोंडी रिपोर्टवरून देवरी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याने तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता तसेच चालकाच्या निष्काळजीपणाबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.




Petrol Price




