धक्कादायक : ६० हजारांत २ महिन्यांच्या चिमुकलीचा केला सौदा
- बाळ खरेदी-विक्रीतील रॅकेटमधील आणखी एका मुलीचा शोध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या बाळ खरेदी-विक्री रॅकेटमध्ये आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नागपुरातून एक बाळ पळविणाऱ्या प्रजापती दाम्पत्याने स्वत:च्याच दोन महिन्यांच्या मुलीचा अवघ्या ६० हजारांत सौदा केला होता. संबंधित मुलीला नागपुरातच विकले होते. संबंधित मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात आठ महिन्यांच्या बाळाच्या अपहरणानंतर या रॅकेटचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत अनेक नवनवीन खुलासे समोर आले. या रॅकेटमध्ये एका तथाकथित डॉक्टरचादेखील सहभाग असल्यामुळे या रॅकेटची व्याप्ती फार मोठी असल्याची बाब स्पष्ट झाली. या टोळीने गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतदेखील निपुत्रिक दाम्पत्यांना बाळांची विक्री केली होती. त्यातही अनेकांना दत्तक प्रक्रियेअंतर्गत बाळ दिल्याची थाप मारली होती व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. या प्रकरणाची पोलिसांकडून अद्यापही पाळेमुळे खणण्यात येत असून, गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
योगेंद्रकुमार प्रजापती व त्याची बायको रिता यांची चौकशी करण्यात येत असता, त्यांनी जुलै महिन्यात त्यांची २ महिन्यांची मुलगी विकल्याची बाब कबूल केली. तिचा जन्म भंडारा जिल्हा रुग्णालयात झाला होता. त्यांनी फरजाना ऊर्फ अंजुम कुरेशी, सीमा परवीन अन्सारी, आएशा खान, सचिन पाटील यांच्यामार्फत मुलीचा सौदा केला. मात्र मुलगी कुणाला विकली याबाबत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खबऱ्यांच्या माध्यमातून संबंधित मुलीची विक्री यशोधरानगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धम्मदीपनगर येथे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित घरी जाऊन चौकशी केली असता, मुलगी तेथे आढळून आली. पोलिसांनी प्रजापती दाम्पत्यासह इतर चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दत्तक देण्याच्या नावाखालीच विक्री
पोलिसांनी संबंधित महिलेची विचारपूस केली असता, तिने आरोपींनी दत्तक देण्याच्या नावाखालीच ६० हजार रुपये घेतल्याचे सांगितले. प्रक्रियेला वेळ लागत असल्याने तुम्ही मुलगी ठेवून घ्या, असे तिला सांगण्यात आले व ऑक्टोबर महिन्यात मुलगी सोपविण्यात आली. या रॅकेटमध्ये बहुतांश मुलांची विक्री दत्तक प्रक्रियेच्या नावाखालीच झाली आहे.
रॅकेटमधील बारावा गुन्हा
संपूर्ण विदर्भाला हादरविणाऱ्या बाळ खरेदी-विक्रीच्या रॅकेटची पाळेमुळे विविध राज्यांतदेखील पसरली होती. या रॅकेटमध्ये पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्ह्यांची नोंद केली होती व पाच गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बुधवारी दाखल झालेला गुन्हा बारावा ठरला. या रॅकेटमध्ये आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे.
News - Nagpur