विवाहित तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या ; मृतदेह कालव्यात फेकला
-रात्री घरून गेला तो परतलाच नाही, मारेकरी कोण? शोधण्याचे आव्हान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : शहरातील भगतसिंग वॉर्डमधील रहिवासी आशिष रवी मेश्राम (२४ वर्षे) या विवाहित तरुणाची मंगळवारी रात्री डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शहरालगतच्या कालव्यात टाकून देण्यात आला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची हत्या कशासाठी झाली आणि कोणी केली, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत आशिष हा मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून स्वतःच्या दुचाकी क्रमांक (एमएच ३३, आर ८१८६) ने गेला. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना सकाळी भगतसिंह वॉर्ड ते तुकुम वॉर्डलगत असलेल्या कालव्यात एक मृतदेह पडलेला असून, बाजूला दुचाकी असल्याचे काही लोकांना दिसले. दुचाकीच्या नंबरवरून ती आशिषचीच असल्याचे पोलिसांनी ओळखले. दरम्यान, देसाईगंज पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राचे घाव दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मृत आशिष मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजाता भोपळे करत आहेत.
मारेकरी तीनपेक्षा जास्त असण्याची शक्यता
मृत आशिष हा शरीरयष्टीने दणकट होता. त्यामुळे त्याला मारणारे एक-दोन लोक नसून किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक असण्याची शक्यता वर्तविली जात असण्य आहे. घटनास्थळाजवळच असलेल्या त्याच्या दुचाकीचा हेडलाईट फुटलेला होता. कोणत्या तरी वादातून त्याची हत्या झाल्याची शक्यता असून, तो वाद कोणता हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
News - Gadchiroli