महत्वाच्या बातम्या

 जनतेच्या मागणीला यश : सिरोंचा शहरातील रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात


- नगरसेवक रंजीत गागापुरवार व इम्तियाज खान यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाची तातडीने कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर यश आले असून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद चौक ते नेहरू चौक हा शहरातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग असून या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खराब झालेली पृष्ठभागाची स्थिती आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होत होते. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली होती. या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती.

नागरिकांच्या या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेवक रंजीत गागापुरवार आणि इम्तियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले. संबंधित रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

नगरसेवकांच्या प्रयत्नांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच आवश्यक डागडुजीची कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.

सध्या सुरू असलेली ही कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपाची असली तरी यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, भविष्यात या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी दर्जेदार आणि टिकाऊ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

याबाबत नगरसेवक रंजीत गागापुरवार यांनी सांगितले की, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांच्या हिताशी संबंधित प्रत्येक प्रश्न प्रशासनासमोर मांडून त्यावर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विकासकामांना गती देणे यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos