गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने सर्पदंशग्रस्त : शालेय विद्यार्थिनीचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपुर येथे वैद्यकीय स्थलांतर


- वैद्यकिय उपचारांकरीता जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्या समन्वयाने जी.एम.सी. रुग्णालय नागपूर येथे स्थलांतर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेतील ०६ विद्यार्थीनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली होती. १० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सदर घटना घडल्यानंतर वस्तीगृहातील काही मुलींना त्रास होत असल्याने काही मुलींना ग्रामीण रुग्णालय धानोरा व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार करण्याकरीता दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने उपचारादरम्यान तीन विद्यार्थीनी मृत पावल्या असून इतर तीन विद्यार्थीनींवर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू होते.
सर्पदंशग्रस्त इतर तीन विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याची माहीती मिळाल्यावरून जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयाने सदर विद्यार्थीनीचे नागपूर येथील जी.एम.सी. रुग्णालय येथे हेलीकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतर करण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीवर नागपूर येथील सर्व सुविधांनी सज्ज अशा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. विद्यार्थीनीच्या उपचारांत विलंब न होता तिला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी आरोग्य विभाग व संबंधीत विभागांसोबत समन्वय साधून तातडीने उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले की, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असल्यामूळे या घटना टाळण्यासाठी सर्व नागरिक व विद्याथ्र्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन विशेष खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थीतीत कुठल्याही अंधश्रध्देला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे.
News - Gadchiroli




Petrol Price




