स्मार्ट प्रकल्पामुळे गडचिरोलीत कृषी उद्योगक्रांती : शेतमालाला मूल्यवर्धन आणि ग्रामीण युवक व महिलांसाठी रोजगार संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून धान, मका व कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारले जात असून, शेतकरी आता केवळ उत्पादक न राहता कृषी उद्योजक बनत आहेत. शेतमालावर प्रक्रिया, प्रतवारी, पॅकेजिंग आणि विक्री व्यवस्थापनाद्वारे उत्पादनाला मूल्यवर्धन मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस गती मिळत आहे.
प्रक्रिया उद्योगांना गती -
स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात राईस मिल, डाळ मिल, गोदाम, प्रक्रिया केंद्र, कलर सॉर्टेक्स तसेच सौरऊर्जा संच यांसारख्या आधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योगांचे जाळे तयार होत असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांमधून व्यवस्थापन, बाजारपेठ आणि उद्योग कौशल्य विकसित होत आहे. उत्पादनापासून उद्योजकत्वापर्यंतचा प्रवास प्रत्यक्षात साकार होत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवणी (बु.) येथील ग्रीनगोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत धान स्वच्छता, प्रतवारी व डाळ प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाची एकूण किंमत ७७.६६ लाख रुपये आहे. तर सिरोंचा येथील प्राणहीता शेतकरी उत्पादक कंपनीकडून २४८.९८ लाख रुपयांचा आधुनिक धान प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून, यामध्ये राईस मिल, गोदाम आणि सौरऊर्जा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
सीमाभागातही आधुनिक सुविधा -
देसाईगंज-वडसा येथील शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत भात प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला असून कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनीकडून आधुनिक धान प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे. तसेच मूलचेरा येथील शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत मका व कडधान्य स्वच्छता, प्रतवारी व प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे दुर्गम व सीमाभागातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रक्रिया व साठवणूक सुविधा मिळणार आहेत.
गडचिरोली येथील झाडीपट्टी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतही धान प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून, आधुनिक राईस मिल, कलर सॉर्टेक्स, वेब्रिज आणि गोदाम सुविधा तयार केल्या जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतमालाला अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सौरऊर्जेमुळे उद्योगांना स्वावलंबन -
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी सौरऊर्जा संच उभारण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण प्रक्रिया उद्योगांना स्थिर वीजपुरवठा उपलब्ध होतो आणि उद्योग अधिक स्वावलंबी बनतात. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
ग्रामीण युवक व महिलांसाठी रोजगार -
या प्रकल्पामुळे ग्रामीण युवक आणि महिला बचत गटांसाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, साठवणूक आणि विक्री व्यवस्थापन यामध्ये स्थानिक मनुष्यबळाला काम उपलब्ध होत असून, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा चालना मिळत आहे.
स्मार्ट प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणे हा जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. गडचिरोलीतील सेंद्रिय तांदूळ, मका, डाळ तसेच आंबा, चिकू व फळपिकांवर आधारित उद्योग उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




