सेवा-जी हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड : ६ जुगारी ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील सेवा-जी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते, डीव्हीआरसह एकूण ₹४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हॉटेल व्यवस्थापकासह संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, तुकूम येथील सेवा-जी हॉटेलच्या रूम क्रमांक सी-०२ मध्ये पैशावर हारजीतचा जुगार सुरू आहे. त्यानंतर आवश्यक परवानगी घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर धाड टाकली.
धाडीदरम्यान संबंधित खोलीची तपासणी करण्यात आली असता एका बेडवर व आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसून सहा जण ५२ पत्त्यांच्या साहाय्याने पैशावर हारजीतचा जुगार खेळताना आढळले. टेबलवर रोख रक्कम व ताशपत्तेही आढळून आले.
पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि डावावरील पैसे मिळून ₹३६,९०० जप्त करण्यात आले. तसेच ५२ पत्त्यांचा नवीन संच, ग्राहक नोंदणी रजिस्टर आणि सीपी प्लस कंपनीचा डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹४७ हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत आरोपी मोहम्मद सरफराजुल हक, आमीन गफार बेग, इरफान खान लियाफत खान, राजीक शहा आबीद शहा, आयुष अनिल तुराणकर आणि जावेद करीम शहा या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच हॉटेल व्यवस्थापक प्रणय सत्यदेव मडपल्लीवार याने जुगार खेळण्यासाठी खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालासह सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ४, ५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष ज्ञानेश्वर निंभोरकर, विनोद भुरले, सर्वेश बेलसरे तसेच चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे, अजीत शेंडे, किशोर वाकाटे, सुमीत बरडे आणि प्रतीक हेमके यांनी केली.
News - Chandrapur




Petrol Price




