महत्वाच्या बातम्या

 अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची धडक मोहीम : ३.३५ लाखांचा दारुसाठा जप्त


- १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई; १५ गुन्हे दाखल, १६ जणांवर गुन्हा नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील तब्बल १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी ३ लाख ३५ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे.

या कारवाईत दारूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये गावठी दारूसह देशी आणि विदेशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयित ठिकाणांवर लक्ष ठेवून छापेमारी केली जात आहे. विविध गावांमध्ये केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात दारुसाठा पोलिसांच्या हाती लागला असून तो जप्त करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्री करणाऱ्यांसोबतच दारूची वाहतूक करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये काही प्रमाणात खळबळ उडाली आहे.

- दररोज कारवाईचे संकेत
जिल्ह्यातील सर्व १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून संकेत देण्यात आले आहेत. अवैध दारूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार छापे टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काळातही अशा प्रकारच्या कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

- कारवाईनंतरही खुलेआम विक्रीचा प्रश्न
पोलिसांकडून नियमितपणे कारवाई केली जात असली, तरी जिल्ह्यातील अनेक भागांत अवैध दारूविक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. गावठी दारूसह देशी व विदेशी दारूची विक्री काही ठिकाणी खुलेआम होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ दारुसाठा जप्त करून किंवा गुन्हे दाखल करून न थांबता, अवैध दारूविक्रीच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याची गरज आहे.

वारंवार अवैध दारूविक्री करताना आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई, दारूचा पुरवठा करणाऱ्या मुख्य व्यक्तींचा शोध आणि अवैध विक्रीची ठिकाणे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो. त्यामुळे पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईसोबतच सातत्यपूर्ण देखरेख आणि कठोर अंमलबजावणी आवश्यक ठरणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos