महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना एक्स्प्रेसमधून १०.६५ लाखांचा गांजा जप्त


- २१.३० किलो गांजासह तरुणाला अटक; आरपीएफच्या गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या आरपीएफ गुन्हे शाखेने कारवाई करीत रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमधून तब्बल १० लाख ६५ हजार रुपये किमतीचा २१.३० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी एका तरुणाला अटक करून पुढील कारवाईसाठी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. विमलेश रामकिसन अहिरवार २६ वर्षे रा. गंजबासौदा, जि. विदिशा, मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेगाडी क्रमांक १२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस**मधून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती आरपीएफच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.

गोंडवाना एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पोहोचताच आरपीएफच्या जवानांनी गाडीतील जनरल कोचची तपासणी सुरू केली. यावेळी संशयावरून विमलेश अहिरवार याच्या हालचालींवर जवानांनी लक्ष ठेवले. तपासणीदरम्यान विमलेशच्या ट्रॉली बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेली काही पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली.

डॉग स्क्वॉडमधील प्रिन्स या श्वानाने ट्रॉली बॅगमध्ये अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. त्यानंतर बॅगची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये २१.३० किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १० लाख ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

आरपीएफच्या गुन्हे शाखेने गांजा आणि संबंधित साहित्य जप्त करून विमलेश अहिरवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

रेल्वे मार्गाने अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफकडून रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानकांवर तपासणी वाढविण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.





  Print






News - Nagpur




Related Photos