महत्वाच्या बातम्या

 वाढदिवसानिमित्त जनसेवेचा आदर्श : माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाखांची देणगी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वाढदिवसाचे औचित्य साधत समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रेरणादायी आदर्श माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी घालून दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या माध्यमातून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारासाठी त्यांनी तब्बल रु १ लाखांचा धनादेश सुपूर्द करून जनसेवेचा संदेश कृतीतून दिला.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या वाढदिवस ते जीवनदान या जनजागृती अभियानाला प्रतिसाद देत डॉ. नेते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ही देणगी दिली. आज आपण दिलेली छोटी मदत, उद्या एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते, या अभियानाच्या संदेशाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ. नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी आणि जिल्हा समन्वयक हर्षाली नैताम यांनी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाढदिवस केवळ शुभेच्छांचा दिवस न ठरता समाजहितासाठी संस्मरणीय व्हावा, या भावनेतून डॉ. नेते यांनी एक लाख रुपयांची देणगी जाहीर करत धनादेश सुपूर्द केला.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या वाढदिवस ते जीवनदान या अभियानाचा उद्देश वाढदिवस, विवाह, सत्कार किंवा इतर आनंदाच्या क्षणांना सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देणे हा आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आणि समाजात दातृत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख हेतू आहे.

विशेष म्हणजे, डॉ. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांनी डॉ. नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर दिवाकर गेडाम आणि डॉ. मडावी यांनी डॉ. नेते यांच्यासमोर या उपक्रमाची आवश्यकता, निधीचे महत्त्व आणि गरजू रुग्णांना होणारा लाभ याची सविस्तर माहिती दिली.

गरजू रुग्णांच्या उपचारासाठी हा निधी किती मोलाचा ठरतो, हे समजताच डॉ. नेते यांनी कोणताही विलंब न करता तत्काळ ₹१ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे सुपूर्द केला. त्यांच्या या निर्णयातून जनसेवा हीच ईश्वरसेवा ही त्यांची जीवनभूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर आर्थिक मदत मिळत असून अनेकांना नवजीवन लाभले आहे. या लोकहितकारी उपक्रमात आपल्या परीने योगदान देता आले, याचा मला मनापासून आनंद आहे. वाढदिवसासारख्या आनंदाच्या दिवशी समाजोपयोगी कार्य करण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने डॉ. अशोकजी नेते यांच्या या उदात्त योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या जनहितैषी कृतीमुळे अनेक गरजू रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

डॉ. अशोकजी नेते यांनी दिलेली ही देणगी केवळ आर्थिक मदत नसून मानवता, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे समाजातील अधिकाधिक नागरिकांनी वाढदिवस, विवाह किंवा इतर शुभप्रसंगी समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos