महत्वाच्या बातम्या

 भरधाव आयशरची दुचाकीला भीषण धडक : दोन युवक जागीच ठार


- भंडारा-टाकळी बायपासवरील भीषण अपघात चालक वाहनासह फरार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा शहरालगतच्या आयटीआय-टाकळी बायपास मार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात आयशर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.

हा अपघात शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान भंडारा-टाकळी बायपास मार्गावर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ पासून वैनगंगा नदीलगत तुमसरकडे जाणाऱ्या मार्गावरील बैलबाजार मैदानाजवळ घडला. या अपघातात सचिन किसन बन्सोड ३२ वर्ष रा. ता. नागभीड, जि. चंद्रपूर आणि पीयूष डहाक या दोघांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही दुचाकीने भंडाऱ्यावरून वरठीकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने काही वेळातच उपचारापूर्वी प्राण सोडला. अपघातानंतर आयशर चालक वाहनासह फरार झाला.

घटनास्थळावरील दृश्य हृदयद्रावक - 

अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. सिमेंटच्या रस्त्यावर दूरवर रक्ताचे ठिपके उडाल्याने अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत होती. दोघांनाही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

वळणामुळे वाढतोय अपघातांचा धोका- 

ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे तीव्र वळण असल्याने भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. लाखनीकडून येणारी वाहने तुमसरकडे वळताना या मार्गावर वारंवार अपघात होत असून हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी वेगमर्यादा, इशारा फलक आणि सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांची कारवाई सुरू -

अपघाताची माहिती मिळताच भंडारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. फरार झालेल्या आयशर वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संबंधित वाहन व चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास भंडारा शहर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos