येनबोडीजवळील भीषण अपघातातील जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-कोठारी मार्गावरील येनबोडी गावाजवळ ५ जून रोजी झालेल्या भीषण अपघातातील जखमी तरुणीचा आज (९ जून) नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव पिकअप वाहनाने ऑटोला दिलेल्या जोरदार धडकेत अनेक प्रवासी जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैभवी संतोष चामलाटे (२२), कुडेसावली, ता. गोंडपिपरी असे मृतक मुलीचे नाव आहे.
माहितीनुसार, कोठारी येथील आबीद अली फतेअली सय्यद (वय ५२) हे आपल्या एमएच-३४ बीएच-४१८० क्रमांकाच्या ऑटोने प्रवासी घेऊन बल्लारपूरकडे येत होते. दुपारी सुमारे २.१५ वाजताच्या सुमारास येनबोडी गावाजवळील देवू रेस्टॉरंटसमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-३४ सीक्यू-१६५२ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने ऑटोला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रस्त्यावर पलटी होऊन रस्त्यालगतच्या नाल्याजवळ जाऊन पडला. अपघातात ऑटोतील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
या अपघातात विकास सुधाकर मडावी (३०), अमित नगर बामणी, अंगत कुमार रामजीत गौतम (४२), अमित नगर बामणी, राजेश मधुकर उईके (३५), अमित नगर बामणी, रिया नानाजी आत्राम (१३), कळमना, पौर्णिमा मंगेश मोरे (२१), कळमना), आदर्श हेमराज सरोवर (१७), पांढरपवनी, ता. राजुरा) आणि वैभवी संतोष चामलाटे (२२), कुढसावली, पो. स्टे. कोठारी) हे जखमी झाले होते. ऑटोचालक आबीद सय्यद यांनाही दुखापत झाली होती.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैभवी संतोष चामलाटे यांच्यावर प्रथम स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अपघात घडवून आणल्यानंतर पिकअप चालक हेमंत बंडू पातलेकर (वय २९), रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर हा वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणीच्या मृत्यूनंतर आरोपी चालकाविरुद्ध अधिक गंभीर कलमांनुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत. मृत्यूमुळे या अपघाताचे गांभीर्य वाढले असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




