महत्वाच्या बातम्या

 एसएएस पोर्टल बंद : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे कामकाज ठप्प


- वृद्ध, निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मनस्ताप; तातडीने तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :  राज्यातील लाखो निराधार, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आधार ठरलेल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे कामकाज एसएएस पोर्टलच्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकृत पोर्टल नियमितपणे सुरू होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेशी संबंधित सर्व ऑनलाइन प्रक्रिया या पोर्टलद्वारे केल्या जातात. मात्र, हे पोर्टल बंद किंवा वारंवार तांत्रिक अडचणींना सामोरे जात असल्याने नवीन अर्ज नोंदणी, लाभार्थ्यांची पडताळणी, मंजुरी प्रक्रिया, त्रुटी दुरुस्ती, डीबीटीशी संबंधित कामे तसेच इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

पोर्टलच्या तांत्रिक समस्येमुळे गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात विलंब होत आहे. अनेक वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना कामासाठी वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून, त्यांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजय गांधी निराधार समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच कामठीच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून योजनांचे कामकाज सुरळीत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके, संजय गांधी निराधार समितीचे भगवान कोरडे, सुभाष संपत धुळसे, चंद्रशेखर गोपाल तुप्पट, नरेश रामदास मोहबे, विनोद जी. बावनकुळे आणि प्रांजल राजेश वाघ यांचा समावेश होता.

दरम्यान, शासनाच्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनांचे कामकाज तांत्रिक अडचणींमुळे रखडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लाभार्थी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos