राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये सचिन यादव व साक्षी पोलीजवार यांची बाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बाळूभाऊ धानोरकर स्मृती राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रन फॉर इन्स्पिरेशन, रन फॉर बाळूभाऊ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला.
स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, भद्रावती ते पडोली चौक या मार्गावर झालेल्या स्पर्धेत पुरुष खुल्या गटात मुंबईच्या सचिन यादवने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. नागपूरच्या राजन यादवने द्वितीय क्रमांक मिळवत ५१ हजार रुपयांचे, तर नागराज खुडसंगेने तृतीय क्रमांकासह ३१ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.
महिला गटात चंद्रपूरच्या साक्षी पोलीजवारने प्रथम क्रमांक मिळवत १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. अभिलाषा भगत हिने द्वितीय १० हजार रुपये, तर श्रद्धा थोरात हिने तृतीय ५ हजार रुपये क्रमांक मिळवला. अचल रमेश कंदुकर हिला प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील धावपटूंसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष गटात विवेक भगत प्रथम २१ हजार रुपये, रितिक ढोडरे द्वितीय ११ हजार रुपये आणि यश सातपुते तृतीय ७ हजार रुपये ठरले. स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे छोटूलाल सोमलकर यांनी तिरंगा लावलेल्या वाहनासह मॅरेथॉनचे नेतृत्व केले. संपूर्ण मार्गावर खेळाडूंचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला.
बक्षीस वितरण समारंभाला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी, अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये क्रीडाविषयी आकर्षण वाढण्यासह आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
News - Chandrapur




Petrol Price




