महत्वाच्या बातम्या

 दोन दिवसांत बैल, गाय अन् शेळीवर वाघाचे हल्ले : चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील वायगाव परिसर आणि नवरगाव उपक्षेत्रात वाघांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत वाघाने एका बैलासह गायीचा बळी घेतला, तर नवरगाव परिसरात पट्टेदार वाघाने शेळी ठार केल्याची घटना घडली. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

भद्रावती तालुक्यातील वायगाव येथे रविवारी २६ जुलै दुपारच्या सुमारास शेतकरी प्रभाकर कुरेकर यांच्या मालकीच्या बैलावर वाघाने हल्ला केला. त्यावेळी शेतकरी आणि शेतमजूर शेतात काम करत होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेतकरी व मजुरांनी आरडाओरड करताच वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र गंभीर जखमी झालेल्या बैलाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला.

यापूर्वी शनिवारी २५ जुलै याच परिसरात वाघाने एका गायीवर हल्ला करून तिला ठार केले होते. ही गाय शेतकरी मडावी यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. सलग दोन दिवसांत दोन जनावरांचा बळी गेल्याने वायगाव परिसरातील शेतकरी धास्तावले असून, शेतीची कामे करताना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नवरगाव उपक्षेत्रातील नाचनभट्टी बिटामध्ये सोमवारी २७ जुलै दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका शेळीवर झडप घालून तिला ठार केले. ही घटना रस्त्यालगत तसेच शेती परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाचनभट्टी येथील शेतकरी ताराचंद चौधरी हे सहकाऱ्यांसह मिनघरी फाटा, गडबोरी नहर आणि नाचनभट्टी चौक परिसरात शेळ्या चारत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक एका शेळीवर हल्ला करत तिला ठार केले. या घटनेत ताराचंद चौधरी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे वायगाव, नाचनभट्टी आणि परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांना शेतात जाण्यासही भीती वाटत आहे. वनविभागाने प्रभावित भागात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, पिंजरे व कॅमेरा ट्रॅप बसवावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos