महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबत सामाजिक उत्तरदायित्वही जपावे : इंजि. प्रमोद पिपरे


- संताजी सोशल मंडळातर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक उत्तरदायित्व, संस्कार आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले.

संताजी सोशल मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संताजी भवन येथे उत्साहात पार पडला. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा अधिक तसेच बारावी बोर्ड परीक्षेत ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपीठ, मुंबईचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, इंजि. प्रमोद पिपरे, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रनोती निंबोरकर, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका योगिता पिपरे, संताजी सोशल मंडळाचे सचिव विठ्ठलराव कोठारे, उपाध्यक्ष ॲड. रामदास कुनघाडकर, अरुणराव निंबाळकर, सुरेश भांडेकर तसेच नागपूरचे प्रतिष्ठित व्यापारी बालाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना इंजि. प्रमोद पिपरे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यास प्रोत्साहन देणे होय. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रायोजकांच्या सहकार्याने दारिद्र्यरेषेखालील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला समाजबांधव, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा खोब्रागडे आणि सुरेश निंबोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक राजेंद्र भुरसे यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos