महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूरसाठी मोजावे लागणार आठ रुपये जादा; हंगामी भाडेवाढ मागे : मात्र नियमित दरवाढीचा प्रवाशांना फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासासाठी आता प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ मागे घेतली असली तरी १३.५६ टक्के नियमित भाडेवाढीला मंजुरी दिल्याने १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून सुधारित तिकीट दर लागू झाले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

नव्या दरवाढीनुसार गडचिरोली ते नागपूर प्रवासासाठी आता १२ रुपये अधिक मोजावे लागणार असून, गडचिरोली ते चंद्रपूर प्रवासासाठी आठ रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटी ही सार्वजनिक वाहतुकीची प्रमुख सुविधा असल्याने या भाडेवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे.

खर्च वाढल्याने भाडेवाढीचा निर्णय -

डिझेलच्या दरातील वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, तसेच बसचे सुटे भाग, टायर, देखभाल-दुरुस्ती आणि इतर संचालन खर्चात झालेली वाढ यामुळे एसटीप्रशासनावर आर्थिक ताण वाढला आहे. प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.मात्र, आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य प्रवाशांना या दरवाढीचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

प्रमुख मार्गांवरील सुधारित भाडे - 

सुधारित दरानुसार गडचिरोली-नागपूर मार्गाचे तिकीट भाडे ३२३ रुपयांवरून ३३५ रुपये झाले आहे. तर गडचिरोली-चंद्रपूर मार्गाचे भाडे १५७ रुपयांवरून १६५ रुपये करण्यात आले आहे.

याशिवाय विविध मार्गांवरील नवीन भाडे पुढीलप्रमाणे आहे :

गडचिरोली-आरमोरी : ६९ रुपयांवरून ७० रुपयेगडचिरोली-चामोर्शी : ६९ रुपयांवरून ७० रुपये
गडचिरोली-धानोरा : ६९ रुपयांवरून ७० रुपये
गडचिरोली-अहेरी : २२३ रुपयांवरून २३० रुपये
गडचिरोली-मूल : ८० रुपयांवरून ८५ रुपये
गडचिरोली-देसाईगंज : १०२ रुपयांवरून १०५ रुपये
गडचिरोली-कुरखेडा : १४६ रुपयांवरून १५० रुपये
गडचिरोली-सिरोंचा : ४०० रुपयांवरून ४१५ रुपये

प्रवाशांना दर्जेदार सेवेची अपेक्षा -

तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होणार असली तरी त्याबदल्यात अधिक सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याने वाढलेल्या दरांसोबत सेवेतही सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos