महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरमध्ये पूरस्थिती गंभीर : विसापूर मार्ग बंद, इरई धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे वर्धा, इरईसह प्रमुख नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वर्धा नदीने रौद्ररूप धारण केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बल्लारपूर वस्ती विभागामार्गे विसापूरकडे जाणारा मार्ग शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून पाण्याखाली गेल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, वर्धा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे भोयेगाव येथील पूलही पाण्याखाली गेला असून भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे.


हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याचवेळी इरई धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धरणाची पाणीपातळी २०५.९५० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास इरई धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

त्यामुळे पद्मापूर, किटाळा, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळा, वडोळी, चिवेली, कडोळी, पायली, विचोडा, खैरगाव, चांदमुर्ली, विचोडा बुजुर्ग, आंबोग, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोळी, मिनागाव, वडगाव, चंद्रपूर, माना तसेच इरई नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.      

प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये, तसेच जनावरे व इतर मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता हा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला.





  Print






News - Chandrapur




Related Photos