विविध कार्यालयांची नागरिकांशी संवाद साधत तुमसर येथे वृक्षारोपण मोहीम

- अपर मुख्य सचिव महसूल विकास खारगे यांचा भंडारा दौरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याचा दौरा करून महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कार्यालयांतील अभिलेख व दस्तऐवजांचे व्यवस्थापन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली. विविध कार्यालयांतील अधिकाऱ्यांना कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना देतानाच भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या.
दौऱ्याच्या प्रारंभी खारगे यांनी भंडारा येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपनिबंधक प्रकाश ढगे यांनी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाची, अभिलेख व्यवस्थापनाची तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती खारगे यांना दिली. त्यानंतर त्यांनी मोहाडी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच आंधळगाव येथील टसर सिल्क युनिटला भेट देऊन तेथील कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर खारगे यांनी तुमसर येथील उपनिबंधक (मुद्रांक) कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी श्री. खारगे यांची भेट घेऊन विविध स्थानिक विकासकामे व महसूल विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.
संपूर्ण दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत उपस्थित होते. विविध ठिकाणच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली, आवश्यक सूचना दिल्या तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.
News - Bhandara




Petrol Price




