गडचिरोलीत ६ लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू व कार जप्त : देसाईगंज पोलिसांची वैनगंगा नदीकाठावर कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी लागू असतानाही छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देसाईगंज पोलीस पथकाने वैनगंगा नदीकाठाजवळ सापळा रचून ६ लाख रुपये किमतीची अवैध देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दारू पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले आहेत. या आदेशान्वये २१ जून रोजी देसाईगंज येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक अज्ञात इसम ब्राम्हपुरी ते देसाईगंज मार्गाने सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ कारमधून (क्र. MH 20 BC 8161) मोठ्या प्रमाणावर अवैध दारू घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस पथकाने ब्राम्हपुरी ते देसाईगंज रोडवरील वैनगंगा नदीकाठाजवळ तात्काळ नाकाबंदी करून सापळा रचला.
दरम्यान, ब्राम्हपुरीकडून एक संशयास्पद कार येताना दिसताच पोलिसांनी रस्त्यावर अडथळा निर्माण करून चालकाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने गाडी बाजूला थांबवल्यानंतर पोलिसांनी नाव विचारले असता, त्याने आपले नाव अमन अभिमन अलोने (वय २३, रा. मातावार्ड, देसाईगंज) असे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची कसून झडती घेतली असता, कारमध्ये देशी दारू संत्री कंपनीच्या ९० मि.ली. मापाच्या एकूण २,५०० प्लास्टिक बॉटल्स भरलेले २५ खरड्याचे बॉक्स आढळले. पोलिसांनी २ लाख रुपये किमतीची ही अवैध दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली ४ लाख रुपयांची मारुती सुझुकी रिट्झ कार, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. पकडलेल्या चालकाकडे अधिक चौकशी केली असता, हा दारूचा साठा आशिष नरेंद्र डाहाट (वय ३७, रा. गांधीवार्ड, देसाईगंज) याच्या मालकीचा असल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी आशिष डाहाट याचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संदीप आगरकर करत आहेत.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. व उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप आगरकर, पोलीस अंमलदार नितेश कडव, विलास विधाते, महिला पोलीस शिपाई सारमपल्लीवार आणि चालक पोलीस हवालदार राऊत यांनी पार पाडली.
News - Gadchiroli




Petrol Price




