महत्वाच्या बातम्या

 दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १४.०१ लाखांची फसवणूक : विद्या निमजेविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी विद्या विठ्ठल निमजे हिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच गैरकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९ अंतर्गत विविध कलमांन्वये ३१ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, बालाजी वॉर्ड येथील अर्चना सचिन निखाडे ४१ वर्ष यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, त्यांची परिचित असलेल्या विद्या विठ्ठल निमजे हिने वर्ष २०२३ मध्ये नागपूर येथील एका बँकेच्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवल्यास रक्कम दुप्पट मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या योजनेचा लाभ अनेकांना झाल्याचे सांगत तिने सातत्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले.

त्यानुसार, १४ जून २०२३ रोजी अर्चना निखाडे यांनी आपल्या आई-वडिलांचे १ लाख १० हजार रुपये विद्या निमजे हिच्याकडे सुपूर्द केले. मुदत पूर्ण झाल्यानंतर रक्कम परत मागितली असता आरोपीने आठ दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर वारंवार टाळाटाळ करत अखेर पैसे परत देण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, २८ जुलै २०२६ रोजी वृत्तपत्रांमधून विद्या निमजे हिला अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली. त्यानंतर त्या चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या असता तेथे अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या इतर पीडितांचीही भेट झाली. सर्वांनी गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेऊन परत न केल्याची तक्रार केली.

तक्रारीनुसार, विद्या निमजे हिने रेखा पाजनकर, सुनीता दिकोडवार, सुनीता पाठक, सरोज सोनी, उषा खाडीलकर, किशोरी खाडीलकर, अर्चना सोनकुसरे, कांचन धार्मिक, रागिणी चिमुरकर, निश्री सोनी, आर. पी. सोनी, निर्मला सोनी यांच्यासह अन्य व्यक्तींकडून एकूण १४ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बीएनएस तसेच गैरकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, २०१९ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खंडाईत करीत आहेत.

वर्ष विशेष म्हणजे, मुख्य आरोपी विद्या विठ्ठल निमजे हिला यापूर्वीही एका गाजलेल्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात अघोरी पूजा व तंत्र-मंत्राच्या नावाखाली वैशाली अनिल खनके यांची २५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर असून, त्या गुन्ह्याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos