महत्वाच्या बातम्या

 कामगार चौकात धारदार शस्त्रासह दहशत माजवणारा अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील कामगार चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र हातात घेऊन आरडाओरड करत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका इसमाला चंद्रपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तातडीची कारवाई करत अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१६ जुलै) डी.बी. स्टाफ पेट्रोलिंगवर असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, कामगार चौक येथे एक इसम धारदार शस्त्र घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना घाबरवत दहशत निर्माण करत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

तेथे एक व्यक्ती हातात लोखंडी धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करत असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवशंकर उर्फ भोला विजयपाल सिंह (वय ४२) असून तो मूळचा अमौली, गुजेला, कानपूर नगर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. सध्या तो कामगार चौक, लालपेठ कॉलरी, चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे.

आरोपीच्या ताब्यातून सुमारे १५.५ इंच लांबीचे लोखंडी धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. या शस्त्राची मुठ ४.५ इंच, पाते ११ इंच लांब व मध्यभागी ३ इंच रुंद असून त्याची अंदाजे किंमत ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील डि.बी. पथक. मपोहवा. भावना रामटेके, पो. हवा. संजय धोटे, कपुरचंद खरवार, जावेद सिद्दीकी, रूपेश रणदिवे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सुशांत घिवे, प्रफुल भैसारे, दिपीका झिंगरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos