लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून धनुर्वातग्रस्त युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी मूल्ये जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दुर्गम वाटरा गावातील २४ वर्षीय सागर शंकर मेडपल्ली यांच्या उपचारासाठी तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सागर यांच्यावर सध्या नागपूर येथील आयुष्मान हॉस्पिटलमध्ये धनुर्वात (टिटनेस) या गंभीर आजारावर उपचार सुरू आहेत.
गंजलेल्या खिळ्यामुळे झालेल्या दुखापतीनंतर सागर यांना धनुर्वाताची लागण झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना १४ विशेष इंजेक्शन्स देणे आवश्यक असून प्रत्येक इंजेक्शनची किंमत सुमारे ₹२० हजार आहे. त्यामुळे उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेरचा होता.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि उपचाराची तातडी लक्षात घेऊन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने या जीवनरक्षक इंजेक्शन्सचा खर्च भागविण्यासाठी तात्काळ रु.२.८० लाखांची आर्थिक मदत दिली. त्यामुळे त्यांच्या उपचारात कोणताही विलंब होणार नाही, याची कंपनीने काळजी घेतली.
यावेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सागर यांच्या लवकरात लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कंपनीने या परिसरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला असून, यापुढेही मानवतावादी कार्यांसाठी आवश्यक ते सहकार्य सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
कंपनीकडून वेळेत मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे सागर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या व्यवस्थापनाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सध्या सागर यांच्यावर नागपूर येथील आयुष्मान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ते पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




