श्रीनगरच्या नौगाममध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांचा हल्ला : पोलीस कर्मचारी शहीद


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
नौगाम परिसरातील अरीबागमध्ये राहणाऱ्या भाजप नेत्याच्या घरी दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झालाय. इतकच नाही तर दहशदवाद्यांनी हल्ल्यानंतर पळून जाताना सुरक्षारक्षकाची रायफलही पळवून नेली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी अरीबाग पोलिसांनी आणि सैन्याने शोधमोहीम सुरु केली आहे. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अनवर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी अचनाक हल्ला चढवला. गोळीबार करत दहशतवाद्यांनी खान यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराबाहेरील गार्ड पोस्टवरील पोलीस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले. हल्ला झाला त्यावेळी भाजप नेते अनवर खान घरात उपस्थित नव्हते. दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करुन त्याची रायफल घेऊन पळाले. गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार सुरु असतानाच त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याचे जवान घटनास्थळी पोहोचले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आणि सैन्याच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली आहे. आसपास राहणाऱ्या लोकांकडे चौकशी करण्यात येत आहे. मागील चार दिवसातील राजकीय नेत्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला. तर फरीदा खान या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. फरीदा खान यांना परिसरातीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दहशतवादी संघटना द रेजिस्टेंट्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सोपोर दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची ओळख पटवल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी हल्ल्यातील सहभागी लष्कर-ए-तोयबाच्या एका ओव्हरग्राऊंड वर्करला अटक केल्याची माहितीही विजय कुमार यांनी दिलीय.
  Print


News - World | Posted : 2021-04-01


Related Photos