केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उद्धवसेनेकडून विजय जल्लोष


- छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी; युवकांच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. युवाशक्तीचा विजय झाला, केंद्र सरकार नमले तानाशाही नमली अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले की, दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर युवकांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेचा निषेध म्हणून देशभरातील युवक रस्त्यावर उतरले आणि विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले. युवकांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर सरकारला माघार घेत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला, असा दावा उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
विजय जल्लोषादरम्यान युवकांच्या संघर्षाला सलाम करत उपस्थितांनी हा विजय युवकांच्या एकजुटीचा असल्याचे सांगितले. अन्यायाविरोधात युवकांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाल्याचा विश्वास व्यक्त करत केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली. यापुढेही युवकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमोद भोमले, अविनाश काकडे, महेंद्र मुनेश्वर, प्रवीण पेठे, रमेश दिवटे, सुदाम पवार, गोपाल दुधाने, पंकज सत्यकार, रवि चव्हाण, खुशाल राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद देवडे, सुभाष कडे, स्वप्निल वागळे, देवानंद चौधरी, मंगेश शेंडे, सतीश नवरखेडे, दामोदर मुळे, प्रदीप मस्के, संतोष साळवे, निलेश बोंद्रे, शेखर वाळके, विठ्ठल वंजारी, गजानन जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




