महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरात एमडी विक्रीचा कट उधळला : पोलिसांच्या सापळ्यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील न्यू पेपरमील कॉलनी, कन्नमवार वॉर्ड परिसरात मॅफेड्रॉन एमडी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी दोन संशयित येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून एमडी अंमली पदार्थासह एकूण १ लाख ९९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी न्यू पेपरमील कॉलनी, कन्नमवार वॉर्ड येथे काळ्या व ग्रे रंगाच्या टी-शर्टमधील दोन युवक मोटारसायकलवरून एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून दोन्ही संशयितांची अंगझडती घेतली.

तपासादरम्यान त्यांच्याकडून ४.४५० ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी अंमली पदार्थ किंमत २२ हजार ९२० रुपये, आयफोन १३ ५० हजार रुपये, रिअलमी पी-१ ५जी मोबाईल, टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल क्रं. एमएच-३४ सीएच-५१९४, तसेच डिजिटल वजनकाटा असा एकूण १ लाख ९९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात बल्लारपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, शहरातील अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडीत, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, महेश कुकूडकर, लखन चव्हाण, वैभव गाडगे, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी तसेच महिला पोलीस अंमलदार अनिता नायडू यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos