त्या गरोदर मातेपुढे आरोग्य यंत्रणा हतबल


- प्रसूतीची तारीख उलटूनही रुग्णालयात दाखल होण्यास नकार : प्रशासनाकडून पुन्हा समुपदेशन
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील तांबडा टोला येथील एका उच्च जोखमीच्या गरोदर महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वारंवार विनंतीनंतरही रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गरोदर महिलेच्या तसेच बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला असतानाही संबंधित महिला व तिचे कुटुंबीय त्यास सहकार्य करत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाला आहे.
तांबडा टोला येथील संबंधित महिलेची प्रसूतीची संभाव्य तारीख ९ जुलै रोजीच उलटून गेली आहे. विशेष म्हणजे, ती सिकलसेलसह इतर काही गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याने तिची गर्भावस्था उच्च जोखमीची मानली जात आहे. त्यामुळे केव्हाही प्रसूती होण्याची शक्यता असून तिच्या आरोग्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ११ जुलैच्या रात्री तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे, एएनएम कुडमेथे, अंजूरनी बिश्वास आणि अश्विनी मडावी यांनी संबंधित महिलेच्या घरी भेट देऊन तिची तपासणी केली. प्रसूती सुरक्षितरीत्या पार पडावी यासाठी तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. गावातील नागरिकांनीही तिला व तिच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आम्ही स्वतः संबंधित गरोदर मातेच्या घरी जाऊन तिची आरोग्य तपासणी केली आणि प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने नकार दिल्याची नोंद करण्यात आली आहे. गावकऱ्यांनीही तिला समजावून सांगितले आहे. प्रशासनातर्फे तिचे पुन्हा समुपदेशन करण्यात येणार असून तिची आणि बाळाची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




