महत्वाच्या बातम्या

 पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणा­या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला असून गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही माओवादी शिल्लक नाही. गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सातत्याने अभियान राबविण्यात येऊन ऑपरेशन अंतिम प्रहार च्या माध्यमातून विशेष शोध मोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांची दहशत संपुष्टात आणली आहे. १२/०७/२०२६ रोजी काही अज्ञात व्यक्तींकडून माओवादी असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत पत्रके व बॅनर लावण्यात आले होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने सदर दहशत निर्माण करणा­या दोन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे की, १२/०७/२०२६ रोजी पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण ५ किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणा­या रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाच्या खालील बाजुस असलेल्या लोखंडी एंगलला एक लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच त्याचे जवळच जमीनीवर दगडाखाली एक व बाजुस एक पांढ­या रंगाचे कागदी पोस्टर मिळून आले होते. सदर पोस्टर व बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता.

सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशान्वये आरोपींचा शोध घेणेकामी तपास सुरू करण्यात आला. यावरून १४/०७/२०२६ रोजी पोस्टे पिपली बुर्गी येथे अप. क्र. ०१/२०२६ कलम ३५३(१) (ब), १८९(2), १९० ६१(2) भा.न्या.स., कलम १०, १३, २०, ३९ बेकायदा कृत्य अधि. व कलम १३५ महा. पो. अधि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेणे कामी शोध मोहिम राबविण्यात आली. सदर तपासादरम्यान तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे इसम नामे १ शिवा अनिल मिस्त्री ४८ वर्ष, रा. तरुणनगर ता. पाखांजुर जि. कांकेर छ.ग. २ रोहीत रंज्जीत मल्लीक  २५ वर्ष, रा. वटेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने माओवादी असल्याचे भासवून सदर पत्रके व बॅनर लावल्याचे निष्पन्न झाले. यावरून गडचिरोली पोलीसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी सदर कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले असून नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये तसेच या प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होवू नये. याप्रकारे कोणीही नागरिकांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही  पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos