महत्वाच्या बातम्या

 तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला : जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मंगळवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक झडप घातल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वनिता शंकर उईके (वय ५५) असे मृतक महिलांचे नाव आहे.

या किटाडी मेंढा परिसरातील रहिवासी असून, त्या मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील जंगल परिसरात तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेल्या होत्या. वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ६९ मध्ये त्या संकलन करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

तेंदूपत्ता हंगामामुळे सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक जंगलात जात आहेत. अशा परिस्थितीत ही घटना घडल्याने जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व एकट्याने जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देऊन शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृत्यूच्या या घटनेमुळे उईके कुटुंबावर शोककळा पसरली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos