दहेगाव येथे भीषण तिहेरी अपघात : कारचालक ठार, दोन महिला गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर–सावनेर महामार्गावरील दहेगाव रंगारी परिसरात सोमवारी १३ रात्री सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला. यू-टर्न घेत असलेल्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर मागून आलेल्या तिसऱ्या वाहनानेही धडक देत घटनास्थळावरून पलायन केले. या भीषण अपघातात एका कारचालकाचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मृत कारचालकाचे नाव यशवंत चंदेल २८ वर्ष रा. निंबा, ता. पारशिवनी असे आहे. हा अपघात खापरखेडा ता. सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी परिसरातील एका लॉनसमोर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२७/बीई-६१६३ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार सावनेरहून नागपूरच्या दिशेने जात होती. दहेगाव रंगारी परिसरात एका लॉनसमोर चालकाने यू-टर्न घेत असताना नागपूरहून सावनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-२०/बीएन-५०७९ क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या हुंदाई आय-२० कारने स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर आय-२० कारच्या मागून वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या तिसऱ्या वाहनानेही आय-२० कारला धडक दिली. त्यानंतर हे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पसार झालेले वाहन महिंद्रा थार असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.
अपघाताची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट डिझायर कारचा पुढील टायर फुटून वाहन रस्त्याच्या मध्यभागी आडवे झाले. त्यामुळे सावनेरकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची नोंद करण्यात आली असून पसार झालेल्या तिसऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
News - Nagpur




Petrol Price




