महत्वाच्या बातम्या

 शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी : सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : घराला कुलूप लावून भातलावणीच्या कामासाठी शेतात गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे घडली. ही घटना १६ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार, मडेघाट येथील रहिवासी जितेंद्र कुंडलिक ठाकरे ३१ वर्षे यांनी याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ठाकरे कुटुंबीय १६ जुलै रोजी सकाळी घराला कुलूप लावून शेतातील भातलावणीच्या कामासाठी गेले होते. घराची चावी त्यांनी नेहमीप्रमाणे दरवाजालगतच्या खिडकीत ठेवली होती.

कुटुंबीय घराबाहेर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी खिडकीत ठेवलेली चावी घेऊन घराचे कुलूप उघडले किंवा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी स्वयंपाकघरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. कपाटातील ४७ हजार ६६० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने तसेच २ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६६० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos