कुरखेडा : काका-पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / कुरखेडा : उधार दिलेल्या एक लाख रुपयांच्या परतफेडीवरून कुरखेडा शहरातील फवारा चौकात धक्कादायक घटना घडली. शनिवारी सायंकाळी शुभम कृष्णाजी आंबेकर (वय ३०, रा. देसाईगंज) व त्यांच्या काका घनशाम वासुदेव आंबेकर (रा. कोसी) यांवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये शुभम आंबेकर यांनी गरजेपोटी विनोद श्रावण खंडाईत याला ऑनलाइन एक लाख रुपये दिले होते. पैशांची वारंवार मागणी करूनही परतफेड न झाल्याने शनिवारी शुभम हे काका घनशाम आंबेकर यांच्यासह कुरखेडा येथे गेले. सायंकाळी फवारा चौकातील पानठेल्यावर पैशांची मागणी करत असताना वाद निर्माण झाला. त्यावेळी आरोपी अरबाज व परवेज लोखंडी रॉड घेऊन घटनास्थळी आले आणि दोघांवर मारहाण केली.
घनशाम आंबेकर यांनी पुतण्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाव घेत मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुरखेडा पोलिसांनी शुभम आंबेकर यांची तक्रार नोंदवत विनोद खंडाईत, विकास खंडाईत, अरबाज आणि परवेज यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकी व सामूहिक कट रचल्याचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
कुरखेडा शहरात मागील काही दिवसांत किरकोळ वादावरून जीवघेणे हल्ले वाढले असून प्रशासन आणि पोलिसांची सतर्कता आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




